• Sat. Sep 21st, 2024

सीपीआर अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज बनविणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2023
सीपीआर अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज बनविणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

होमिओपॅथी उपचारांची बाह्य रुग्णसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार

कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): मुंबई, पुण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये मोफत दर्जेदार आरोग्य सेवा- सुविधा उपलब्ध करुन देऊन सीपीआर हे अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असे रुग्णालय बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सीपीआरमधील अतिविशेषोपचार सुविधेचे लोकार्पण तसेच बधिरीकरण यंत्राचे अनावरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सीपीआरला भेट देऊन सुरु असलेल्या बाह्यरुग्ण सेवांचा सविस्तर माहिती फलक लावण्याची सूचना या भेटीदरम्यान केली होती. या बाह्यरुग्ण सेवा डॅशबोर्डचे अनावरणही मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली सीपीआर रुग्णालयामधील रुग्णसेवेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. एक सप्टेंबरपासून होमिओपॅथी बाह्य रुग्णसेवेचीही याठिकाणी सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, क्षयरोग विभागप्रमुख डॉ. अनिता सैबन्नावर, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. वसंत देशमुख, बालरोगतज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, हृदयरोग शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. भूपेंद्र पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारक, रुग्ण, नागरिक उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व कर्नाटक राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सीपीआरला आवश्यक ते मनुष्यबळ व अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्री देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सीपीआर रुग्णालयातील अनेक डॉक्टरांची निवृत्ती व बदल्या झाल्यामुळे डॉक्टरांवर अतिरिक्त भार येत आहे.  यावर उपाय म्हणून रिक्त पद भरतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. सीपीआर ही हेरिटज वास्तू असून सीपीआर सह अंतर्गत वास्तूंची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी रक्तदान शिबिरासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय व नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस मिळाव्यात, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी केली असता याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सीपीआरमध्ये अतिविशेषोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा सुरु

सद्यस्थितीत मधुमेह, थायरॉइड व स्थूलता इत्यादी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. या आजारांवर उपचार करण्याऱ्या अतिविशेषोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे आजपासून सुरु करण्यात आली. या सेवांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेचा लाभ संबंधित रुग्णांनी  व त्यांच्या नातेवाईकांनी  घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री मुश्रीफ यांनी केले.

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच इतर शेजारी जिल्ह्यातील विविध आजारांचे रुग्ण येत असतात. रुग्णांसाठी मंगळवार व गुरुवारी अतिविशेषोपचार सेवा देण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.  मंगळवार- सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत- ओपीडी क्र. 112- अंतस्रावी ग्रंथीचे आजार- (उदा. मधूमेह, स्थूलता, गर्भवती स्त्रियांमधील मधूमेह, लवकर वयात येणे किंवा उशीरा वयात येणे, तरुण वयातील रक्तदाब, पीसीओडीचे आजार, हाडांची ठिसूळता, चेह-यावरील अनावश्यक केस, बाळाचे लिंग न समजणे, अवेळी छातीमधून स्त्राव येणे, कमी उंची, पियुशी ग्रंथी, स्वादुपींड, एड्रीनल ग्रंथी यांचे आजार व इत्यादी)

गुरुवार- सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत- ओपीडी रूम क्र. 112- संधीवाताचे आजार -(उदा. आमवात, पाठीच्या मणक्याचा संधीवात (बांबूवात), लूपस, स्केरोडर्मा, गुडघ्यांच्या झीजेचा संधिवात, सोरायसिस, जोग्रेन डीसीज (डोळ्यांची तोंडाची कोरड ), JIA (लहान मुलांमधील संधिवात), ऑस्टीओपोरोसीस (हाडांचा ठिसूळपणा), गाऊट (युरीक ॲसीडचा संधिवात ) मायोसायटीस, सॉफ्ट टिशू हमॅटिझम (टेनिस एल्बो, गोलफर्स एल्बो, टेंडोनाइटीस) इ. या आजारांवर अतिविशेष तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार आहे. तसेच होमिओपॅथी उपचारांची बाह्य रुग्णसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed