मुंबई,दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व) येथे झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास आमदार झिशान सिद्दिकी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, खेरवाडी पोलीस स्टेशनचे अतिरिक्त सहायक पोलीस आयुक्त सुहास कांबळे, परिमंडळ 8चे पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर मंत्री श्री.लोढा यांनी “माझी माती माझा देश” या शिलाफलकाचे अनावरण केले आणि उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेतल्या. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार 2022-23 करिता ‘शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन, चेंबूर’ यांना प्रदान करण्यात आला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 8वी) परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती करिता श्री श्री रविशंकर विद्यामंदिर बोरिवलीचे विद्यार्थी असीम वत्सराज आणि कुमारी तनिष्का कारखानीस यांचा समावेश होता तर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता पार्ले टिळक हायस्कूल अंधेरीचे विद्यार्थी कु.जिवीशा वेश्वकर आणि पार्थ आदरकर याचा समावेश होता.
पालकमंत्री श्री.लोढा यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक राहुल प्रभु यांनी केले.