सांगली दि. १४ (जि.मा.का.) : ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमातून देशवासियांमध्ये आपल्या मातीविषयी अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत मिरज हायस्कूल मिरज येथे उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मिरज हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, तहसीलदार अपर्णा धुमाळ, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारंभनिमित्त माझी माती माझा देश हा उपक्रम देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उपक्रमातून जन माणसात नव चैतन्य निर्माण होत आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊया, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मॉडेल स्कूलचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी केले व मिरज हायस्कूल मध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली.
००००००