• Sat. Sep 21st, 2024

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारात तत्परता दाखवावी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

ByMH LIVE NEWS

Aug 12, 2023
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारात तत्परता दाखवावी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दिनांक 12 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) जिल्ह्यातील मातामृत्यू आणि त्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक जोखीमेखालील गरोदर माता, आजारी बाळाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता अंगणवाडी सेविकांनी दाखवावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत यहामोगी सभागृहात अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित ई-आकार डिजिटल कुशल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, महिला व बालविकास अधिकारी राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.

यावेळी पर्यवेक्षेकांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, एकीकडे अंगणवाडींना सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कुपोषित बालक आणि गरोदर मातेची विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. जर कुपोषित बालक आणि गरोदर माता यांची नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातून आवश्यकतेनुसार  तपासणी करुन घेतल्यास निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण तत्काळ होवून बालमृत्यूू सारख्या समस्या वेळीच नियंत्रणात आणता येतील. जिल्हा प्रशासन आता बालमृत्युबाबत कडक धोरण अमलात आणत असून ज्या  अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालकाचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची एक पगार वाढ आणि दुसऱ्यांदा मृत्यू झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

रॉकेट लर्निंग, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विघमानाने “ई आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रम”  सुरू करण्यात आला ,या कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक बिटनिहाय व्हाट्स अॅप ग्रुप्स बनवण्यात आले आहेत. या ग्रुप्स मध्ये दररोज  एक दिवस आधीच  पूर्वनियोजनासाठी बालकांच्या अभ्यासाचे  व्हिडीओ  स्वयंचलितरित्या येतील आणि अंगणवाडी  सेविकांना डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र प्रत्येक आठवड्याला मिळतील. बालकांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे तसेच शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed