• Tue. Nov 26th, 2024

    प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

    ByMH LIVE NEWS

    Aug 8, 2023
    प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

    नवी दिल्ली, ८ : फळांच्या निर्यात संधींना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि  उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली.

    डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप अपेडाने, भारतातील राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (NPPO),  अमेरिकेची प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा (US-APHIS), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (MSAMB) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद-डाळिंबावरील राष्ट्रीय संशोधन केंद्र, सोलापूर (राष्ट्रीय संशोधन केंद्र-सोलापूर) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने अमेरिकेला रवाना केली.

    अमेरिकेला होत असलेल्या  डाळिंब निर्यातीत वाढ झाल्यास परिणामी  डाळिंबाला चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितले. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.

    निर्यात मूल्य साखळीत आढावा घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अपेडाने  विकसित केलेली प्रणाली अनार नेट (AnarNet) अंतर्गत शेतांची नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने नियमितपणे  जागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतात तयार झालेल्या  उच्च दर्जाच्या डाळिंबाच्या निर्यातीला परवानगी मिळावी, यासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यामध्ये अपेडाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

    महाराष्ट्रातील उच्च दर्जाचे ‘भगवा’ डाळिंब होणार निर्यात

    मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट तत्त्व आणि उत्कृष्ट फळांच्या वैशिष्ट्यांमुळे, महाराष्ट्रातील ‘भगवा’ या प्रकारच्या डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात क्षमता आहे. डाळिंबाच्या  भगवा या वाणाला परदेशी बाजारपेठांमध्ये तुलनेने अधिक मागणी आहे. महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यात संपूर्ण देशभरातील डाळिंबाच्या उत्पादनापैकी पन्नास टक्के उत्पादन होते. डाळिंबाच्या उत्पादनात भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे आणि एकूण लागवडीखालील क्षेत्र सुमारे 2,75,500 हेक्टर आहे.

    0000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed