• Sat. Sep 21st, 2024

साताऱ्यात भीषण दुर्घटना; वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना वायरमना विजेचा धक्का

साताऱ्यात भीषण दुर्घटना; वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना वायरमना विजेचा धक्का

सातारा : खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत विहिरीवर विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान खांबावरुन तारा ओढत असताना वायरमनने अचानक प्रवाह सुरू केल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात कोणतीही स्पष्टोक्ती केलेली नाही. ऋषीकेश प्रकाश कांबळे (वय २७, रा. केसे पाडळी ता. कराड ) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या घटनेत संजय रामचंद्र वीर (वय ५१), अमित महादेव कारंडे (वय ३०) दोघे राहणार केसे पाडळी, ता. कराड, तन्मय रविंद्र अडकड (वय २४, रा. आडुळ ता. पाटण) हे जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात या घटनेचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते, तर वायरमन, अधिकारी व कंत्राटदार यांच्यात कम्युनिकेशन नसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा चरेगाव परिसरात सुरू आहे.

Nagpur News : गुंड, ड्रग तस्कर आबू खानच्या अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर, इमारत पाडली
याबाबत माहिती अशी, की उंब्रज येथील महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या चरेगाव- खालकरवाडी गावच्या हद्दीत खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे विद्युत पोल उभे करून त्यावरून तारा ओढण्याचे काम सुरू होते. खालकरवाडी येथील डोंगर पायथ्याला शनिवारी सायंकाळी काम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथे नेमणूक असलेल्या वायरमनने कामगार विद्युत पोलवरुन खाली उतरले की नाही याची खात्री न करताच या लाइनचा वीज प्रवाह सुरू केला. त्यामुळे खांबावरील तारांमधून प्रवाह लागल्याने खांबावरील ऋषीकेश कांबळे या युवकाचा
शॉक लागून जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले.

क्षमता नाही, तर सुंदरता पाहून… आमदार संजय शिरसाटांनी डिवचले, प्रियांका चतुर्वेदींचे प्रत्युत्तर
त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी मदतकार्य उशिरा पोहचले. तसेच उंब्रज महावितरण कंपनीच्या वायरमनने केलेल्या हलगर्जीपणामुळे एका युवकास जीवितास मुकावे लागल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.

धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का थोरल्या भावाला सहन झाला नाही, घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं
खालकरवाडी गावच्या हद्दीत झालेली ही घटना निष्काळजीपणामुळे घडली आहे. वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना हद्दीतील महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र असे न झाल्याने युवकाचा हाकनाक बळी गेला आहे. ऋषिकेश कांबळेच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला असून सध्यातरी यंत्रणा हातावर घडी तोंडावर बोट ठेवून आहे. तर उंब्रज पोलीस ठाण्यात शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed