• Fri. Jul 3rd, 2026

    प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

    ByMH LIVE NEWS

    Jul 24, 2023
    प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

    मुंबई, दि. २४ : चंद्रपूरसह राज्यात विविध भागात झालेल्या आणि अजूनही काही भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनास पत्र लिहून केली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इंटरनेट, दूरध्वनी सेवा, वीजपुरवठाही अतिवृष्टी आणि पुरामुळे खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या विहित मुदतीत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी करता येणे शक्य होणार नाही. केवळ चंद्रपुरातच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने, केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी खात्यास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या सुरक्षा कवचावर अवलंबून असतो. या योजनेची व्यापकता आणि लेकप्रियता लक्षात घेता केंद्राने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची विनंती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

    000

    दीपक चव्हाण/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed