• Sat. Sep 21st, 2024

अख्ख्या गावाने पती-पत्नीला भूत ठरवलं आणि…; अंनिसने थेट गावात जात अघोरीपणाचा निकाल लावला!

अख्ख्या गावाने पती-पत्नीला भूत ठरवलं आणि…; अंनिसने थेट गावात जात अघोरीपणाचा निकाल लावला!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका आदिवासी दाम्पत्यास डाकीण ठरवून त्यांना उपेक्षित वागणूक देणाऱ्या जनतेचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कारांविरोधात प्रात्यक्षिके दाखवून प्रबोधन केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते या खेड्यात ही घटना घडली होती. प्रबोधनानंतर दाम्पत्य व ग्रामस्थांनी एकमेकांच्या मुखात साखर भरवून झालेल्या प्रकारावर पडदा टाकल्याने भूत ठरविलेल्या दाम्पत्याने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला.

कळमुस्ते (ता. त्र्यंबकेश्वर) आदिवासी खेड्यातील भीमा तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई तेलवडे या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या भावकीतील काही व्यक्तींनी मागील फेब्रुवारीत अंधश्रद्धेतून डाकीण ठरविल्याची तक्रार महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेकडे प्राप्त झाली होती. त्यावेळी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना भेटून जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम दाखल झालेल्या या गुन्ह्यात लावण्याची मागणी महाराष्ट्र अंनिसने केली होती. मात्र तेलवडे कुटुंबीयांचा त्रास कमी न झाल्याने मंगळवारी हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के यांच्या तीन सहकाऱ्यांसह महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, त्र्यंबकेश्वर शाखेचे कार्याध्यक्ष संजय हरळे ,नाशिक शहर शाखेच्या कार्यकर्त्या विजया गोराणे हे सर्व कळमुस्तेमध्ये पोहोचले.

कसब्याची हार-धोक्याची घंटा, भाजप सावध, मुळीक यांची उचलबांगडी, कट्टर RSS स्वयंसेवकाला संधी

पीडित कुटुंब आणि ग्रामस्थांना समोरासमोर आणून दोन्ही बाजूंकडील म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. गावचे सरपंच हिरामण चावरे पोलिस पाटील चिंतामण शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डाकीण या अनिष्ट अघोरी प्रथेबद्दल आणि एकूणच आदिवासी भागातील अंधश्रद्धेबद्दलची कारणमीमांसा केली. डॉ. गोराणे यांनी प्रात्यक्षिके सादर करून प्रबोधन केले.

पोलिस हवालदार एस. के. ठाकरे, एच. पी. गवळी, पोलिस नाईक आर. बी. गवळी यांनी जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर डॉ. गोराणे यांनी पीडित कुटुंबाच्या घरातील अन्न सर्वांसमोर सेवन करून ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर केली. काही पोलिस व कार्यकर्त्यांनीही या घरातील अन्न सेवन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed