मुंबई, दि. 17 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंना प्रशिक्षण, मार्गदर्शनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे देण्यास प्राधान्य असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण विभागाचा सविस्तर आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, ऑलिम्पिक आणि आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना सर्व प्रकारचे मार्गदर्शन, सहकार्य उपलब्ध करण्यात करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येतील. सर्वस्तरावरील व सर्व खेळ प्रकारातील खेळाडूंना शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा नियमितपणे व वेळेत देण्यात येतील.
नुकतेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार लवकरात लवकर प्रदान करण्यात येतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या खेळाडूंसाठीच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/