• Sun. Sep 22nd, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

ByMH LIVE NEWS

Jul 11, 2023
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, 11 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आज केली.

वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीचे आयोजन विज्ञान भवन येथे आज करण्यात आले होते. या बैठकीसाठी मंत्री श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. बैठकीच्या वेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी श्रीमती सीतारामन यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक स्मरणार्थ जारी करण्यात येणाऱ्या नाण्यामध्ये सोन्याचा वापर करण्याबाबत परवानगीची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 2 जून 2023 रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन किल्ले रायगडावर आठवडाभर करण्यात आले होते. या उत्सवांचा एक भाग म्हणून, राज्य शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक विशेष टपाल तिकीट नुकतेच जारी केले.  राज्याभिषेक वर्षानिमित्ताने  स्मारक नाणे जारी करण्याचा प्रस्ताव यापूर्वी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे दिलेला आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे  “होण” काढले होते. या होणची प्रतिकृती असलेले विशेष नाणे 350 व्या राज्यभिषेकाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. हे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून काढून ते जनतेला उपलब्ध करून द्यावे. या नाण्यांनमध्ये सोन्यासह अन्य धातूंचा वापर केला जाईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.  या महत्त्वाच्या प्रस्तावाला जलद मंजुरी देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी केली. यावर केंद्रीय वित्त मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

000000

अंजु निमसरकर /वृत्त क्र.

118 / 11.7.2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed