• Tue. Nov 26th, 2024

    मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2023
    मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 10 : मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास हा ग्रंथरुपाने येणे आवश्यकच आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडात प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. येत्या वर्षभरात हा मोलाचा साहित्य दस्तावेज प्रकाशित होईल, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    दर्शनिका (गॅझेटियर) विभागाच्या वतीने मराठी संगीत रंगभूमीच्या 175 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा ग्रंथ तीन खंडात प्रकाशित केला जाणार आहे. त्याअनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, ग्रंथ खंड निर्मिती समितीचे सदस्य डॉ. वंदना घांगुर्डे, संजय गोसावी, पं. शौनक अभिषेकी, सुलेखनकार अच्युत पालव आदींची उपस्थिती होती.

    यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, संगीत रंगभूमीचा इतिहास जपणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल ही वैभवशाली इतिहासाचे पान आहे. त्यामुळे ती वाटचाल सध्याच्या पिढीसमोर येणे महत्त्वाचे आहे. कालबद्ध कार्यक्रम आखून त्या वेळेत तीनही खंड प्रकाशित होण्याच्या दृष्टीने संपादकीय मंडळातील सर्व समिती सदस्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक सहकार्य विभागाच्या वतीने करण्यात येईल.

    तीन खंडात हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार असून त्याची माहिती यावेळी डॉ. घांगुर्डे यांनी दिली.

    0000

    दीपक चव्हाण/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed