• Tue. Nov 26th, 2024

    शासकीय योजनाचा लाभ मिळाल्याने जगण्यास बळ ; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांची कृतज्ञतेची भावना

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2023
    शासकीय योजनाचा लाभ मिळाल्याने जगण्यास बळ ; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांची कृतज्ञतेची भावना

    धुळे, दि. 10 जुलै 2023 (जिमाका):- “शासकीय योजनांचा लाभ इतक्या तत्परतेने व जलदपणे मिळेल असं वाटलं नव्हतं. ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ या टॅग लाईनला साजेसा शासनाचा जलद कारभार असून शासकीय योजनांचा जलद लाभ मिळाल्याने जीवन जगण्यास बळ मिळालं आहे.” अशा भावना सर्वसामान्य शेतकरी, महिला, शाळकरी मुली, कष्टकरी, बांधकाम कामगारांनी व्यक्त केल्या आहेत. निमित्त होते शासन आपल्या दारी अभियानातंर्गत आयोजित धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमात आलेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

    शिक्षण घेणं सुकर झालं..

     “गावापासून पाच किलोमीटर वरील धुळे तालुक्यातील आर्वीतील विद्यालयात जाण्यासाठी एसटीची खूप वेळ प्रतिक्षा करावी लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होत होता. कधी-कधी एसटी न आल्याने शाळेला अनुपस्थिती होत होती. आता मात्र मला शासनानं सायकल दिल्यामुळे आम्हा मुलींना शिक्षण घेणं सुकर झालं. वेळेचा सदुपयोग ही करता आला. अभ्यासाला अधिक वेळ देता आला.” अशा भावना आर्वी येथील अनुदानित विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या दिव्या मांडगे, विद्या अहिरे व मोनाली सोनवणे या विद्यार्थींनीनी व्यक्त केल्या आहेत. या विद्यार्थीनीना शासनाच्या मानव विकास मिशनच्या माध्यमातून सायकली मिळाल्या आहेत.

    कामगारांना मिळाली सुरक्षेची हमी..

    महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीनं अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळाल्यामुळे आता बांधकाम साईटवर काम करताना त्यांना सुरक्षेची हमी मिळाली असल्याची भावना नानाभाऊ पाटील (सैताळे, ता. जि. धुळे), आशा पाटील , मगंलाबाई निंबा पाटील (माळीच, ता. शिंदखेडा) यांनी व्यक्त केली आहे. कामगार विभागाच्यावतीने अत्यावश्यक संचामध्ये चटई, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, बॅटरी, मच्छरदाणी व बॅग दिली जाते. तर सुरक्षा संचात हेल्मेट, जॅकेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, एअर प्लॅग, मास्क व हॅन्ड ग्लोज असं साहित्य दिलं जातं. मजुरी काम करणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांना 10 हजार 240 रूपये किंमतीचे हे साहित्य घेणं परवडणारं नसतं त्यामुळे कोणत्याही सुरक्षा साहित्याविना कामगार काम करतात. आता मात्र कामगार विभागाने हे साहित्य दिल्याने कामगार हरखून गेले आहेत. त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

    शासनामुळे व्यवसायासाठी मिळाली उमेद

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती (उमेद) अभियानात पाळडदे (ता. जि. धुळे) येथील रेणुका चव्हाण यांनी ओम साईराम बचतगटाच्या माध्यमातून यशवंती पापड उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या पापड उद्योगासाठी शासनाने आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वीस हजार रूपयांपासून सुरू झालेला त्यांचा पापड उद्योग वार्षिक १६ लाख रूपयांच्या आर्थिक उलाढालीचा झाला आहे. “जीवनात कोणतीही नवी आशा, उमेद नसतांना शासनाचं उमेद अभियान मदतीसाठी धावून आलं आणि उद्योग-व्यवसाय करण्यासाठी एक आर्थिक उमेद मिळाली. अशी भावना रेणुका चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

    ट्रॅक्टर मिळाल्याने शेतीची मशागत करणं सहज झाले सुलभ..

    धुळे जिल्ह्यातील तिसगाव (वडेल) ता.जि.धुळे येथील बापू दौलत भामरे यांची अडीच एकर बागायती शेती आहे. बागायती शेती करतांना ते बैलजोडी व पारंपरिक अवजारांसह शेती करत होते. यामुळे शेतीची मशागत करण्यास फार कष्ट घ्यावे लागत होते. त्यांना यावर्षी कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषी ट्रॅक्टरसाठी 1 लाख 25 हजार रुपयांचा लाभ मिळाला तसेच ट्रॅक्टरला आधुनिकतेची जोड म्हणून कृषी विभागामार्फत त्यांना रोटोवेटर मंजूर करण्यात आला असून यासाठी त्यांना 42 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे आता त्या ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करणं सहजशक्य झाले असून त्यांच्या शेतात मका, कापूस पिकांचे उत्पादन घेत आहे. अशी प्रतिक्रिया बापू भामरे यांनी दिली आहे.

    आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा मिळाला सिद्धार्थला लाभ..

    महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना राबवली जाते. या योजनेचे धुळ्यातील प्रियदर्शनी नगर येथे राहणारे लाभार्थी सिद्धार्थ मंगल पवार व श्रीमती पूजा मुरारी चव्हाण यांना या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांस या योजनेतंर्गत लाभ दिला जातो. या अनुदानामुळे विवाहाच्या नंतर येणाऱ्या कौटुंबिक अडचणीसाठी हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असून शासनाचे त्यांनी आभार मानले आहे.

    सुनीलला मिळाली सलून व्यवसायातून उभारी..

    कोविड-19 च्या काळात उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले होते. प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पीएम स्वनिधी)  योजनेचा लाभ मिळाल्याने त्याने आपल्या व्यवसायात पुन्हा उभारी घेतली आहे. कोविड-19 च्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी पथविक्रेता, छोटे व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पीएम स्वनिधी) अंतर्गत लहान व्यवसायांना लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेतंर्गत सुनील नारायण सैंदाणे यांना 10 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्या कर्जावर ७ टक्के वरील व्याज अनुदान शासनस्तरावर देण्यात येते. त्यांनी कर्जाची वेळेवर भरणा केल्यावर त्यांना 1 हजार 200 रुपये परतावा मिळाला. कर्जांची नियमित परतफेड केले म्हणून पुन्हा भारतीय स्टेट बँकेने 20 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. श्री.सैदाने यांनी ही 20 हजाराची रक्कमेची परतफेड नियमित केल्यास त्याला बँकेमार्फत 50 हजाराचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांच्या या सलून व्यवसायातून तो आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह चालवित असून त्याला या योजनेचा लाभ मिळाल्याने त्याने केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

    झेरॉक्स मशिनमुळे मिळाला आधार..

    श्रीमती. मिराबाई रोगु वळवी रा.विजयपूर (खटयाळ) ता. साक्री यांचे शिक्षण पदवी पर्यंत झाले असून त्यांचे पती हे शेती काम करतात. श्रीमती वळवी यांना आदिवासी विकास विभागामार्फत झेरॉक्स मशिन खरेदीसाठी 85 टक्के अनुदानावर 42 हजार 500 रुपयांचा वैयक्तिक स्वरुपांचा लाभ देण्यात आला. हे अनुदान त्यांना मंजूर झाल्यावर त्यांनी गावातच झेरॉक्स व्यवसाय सुरु केला. आता त्यांना या व्यवसायातून दरमहा 3 ते 4 हजार रुपये मिळतात. शासनाच्या या योजनेमुळे त्यांच्या कुटूंबाना आधार मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

    ग्रामपंचायतीला मिळाले भांडी संच…

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवगे गावातील ग्रामपंचायतीसाठी लग्न सोहळा, धार्मिक कार्यक्रम, दशक्रिया विधीसाठी आता विनामूल्य भांडे उपलब्ध होणार आहे. ही किमया झाली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात आलेल्या सामुहिक लाभ योजनेतंर्गत भांडी संच योजनेमुळे. या योजनेतंर्गत पेसा ग्रामपंचायतीसाठी 85 टक्के अनुदानावर 1 लाख 26 हजार 247 इतके सामुहिक अर्थसहाय्य ग्रामपंचायतीला मिळाले. आता ही भांडी मिळाल्याने गावातील नागरिकांना लग्न सोहळा, धार्मिक कार्यक्रम, दशक्रिया विधीसाठी विनामुल्य भांडी उपलब्ध होणार असल्याने शेवगे येथील सरपंच श्रीमती उज्जवला गोटू चौरे यांनी आदिवासी विकास विभाग तसेच शासनाचे आभार मानले आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed