जनाबाई बर्डे ही महिला शिंदे गावात राहत्या घरात सुख-दु:खाचे बघणे, बाहेरचे बघणे, त्यावर मार्ग, तोडगा सांगत असे. आजूबाजूच्या परिसरातील रुग्ण तिच्याकडे उपायांसाठी येत असत. तिच्याकडे संशयित निकेश दादाजी पवार हा देखील दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी येत होता.
मात्र, त्याला जनाबाईने सांगितलेल्या तोडग्याचा काहीही फायदा न झाल्याने त्याला राग आला होता. शुक्रवारी दुपारी जनाबाईकडे मार्ग सांगण्याचा वार होता. त्यामुळे निकेश नेहमीप्रमाणे शिंदे गावात जनाबाईच्या घरी गेला. त्यावेळी घरात असलेल्या जनाबाईवर त्याने सोबत आणलेल्या चाकूचे मानेवर, पोटावर सपासप वार केले. जनाबाई रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडल्याने निकेश पवार याने तिच्या घरातून काढता पाय घेतला.
घटनास्थळी हत्या झालेल्या जनाबाई बर्डेची मावसबहीण रंजना माळी आली. तिला बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आणि हाती चाकू असलेला संशयित निकेश पवार घराबाहेर पडताना दिसल्याने तिने मदतीसाठी आरडाओरडा करीत त्याचा पाठलाग केला. यावेळी निकेश पवार हाती चाकू घेऊन भरवस्तीतील रस्त्याने पळत टोल नाक्याच्या दिशेने गेला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, चाकूचा धाक दाखवत तो गावातून बाहेर पडला. या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच पोलिस शिपाई विष्णू नाईक, मनोहर कोळी या पोलिसांनी शिंदे टोल नाका गाठून संशयित निकेश पवार यास ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.