• Mon. Nov 25th, 2024

    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

    ByMH LIVE NEWS

    Jul 7, 2023
    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

    मुंबई, दि. ७ : राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

    विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, गिरीष महाजन, अशोक चव्हाण, उदय सामंत, अमिन पटेल, आशिष शेलार, नरहरी झिरवाळ, तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, विकास पोतनीस, कपिल पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले, विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती शैला ए., यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

    विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सूचना मांडली.

    मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. दिनांक 17 जुलै ते 4 ऑगस्ट या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस 15 असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे (शनिवार, रविवार) असणार आहेत.

    ०००

    वंदना थोरात/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *