शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोकणात महाड व पोलादपूर तालुक्यात अनेक भाग दरड प्रवण क्षेत्र आहेत. दोन वर्षांपूर्वी महाड तालुक्यात अख्ख तळीये गावच दरडीमुळे नष्ट झाले व अनेकांचे प्राण गेले या भीतीदायक आठवणी आजही मन सुन्न करतात यातच आता पुन्हा एकदा महाड तालुक्यात दरडींचे संकट घोंगाऊ लागले आहे.
महाड तालुक्यात मौजे शेवते गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटामध्ये दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून त्यामूळे शेवते, आडरई व आडराई आंब्याचा माळ या तीन गावांचा संपर्क तालुक्यापासून बंद झाला आहे. प्रशानाने तातडीने उपाययोजना करत केवळ दुचाकी साठी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही मोठी दरड हटवण्याचे दिव्य ब्रेकरने दगड फोडून बाजूला करण्याचे काम महाड सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम करत आहे.
या सगळ्यावर कामावर महाड तहसीलदार महेश शितोळे,महाड एमआयडीसी पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे घटनास्थळी हजर आहेत. महाड उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे यांनीही योग्य त्या सूचना आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला दिल्या आहेत. त्यांनी नुकताच उपविभागातील दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या विभागांचा दौरा करून योग्य त्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.