सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी जवळून वाहत आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर आहे. सद्यस्थतीत जगबुडी नदी ५.२५ मीटरवर वाहत आहे. धोकादायक पातळी ही सात मीटर आहे. खेड नगरपरिषद प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नदीकाठच्या नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खेड तालुक्यात घेरारसाळगड गावात किल्ले रसाळगडच्या पायथ्याशी पेठ बौद्धवाडीजवळ अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता वहातूकीस बंद झाला आहे. दोन दिवस होत असलेल्या जोरदार पावसामुळे तुळशी बुद्रुक येथील प्रकाश सुतार यांच्या घराच्या पडवीवर दरड कोसळून नुकसान झाले आहे.
पावसाच्या जोरदार सरीमुळे मासे खवय्यानी शेताचे बांध, नदीकिनारी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली आहे. खेड तालुक्यात संततधार पावसाने नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतात नांगरणी सुरू झाली आहे. शेतकर्यामधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. २७ जूनच्या मध्यरात्रीपासून पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरीभागात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. तर ग्रामीण भागात शेतकर्यांनी नांगरणी, चिखलणी ही शेतीची कामे सुरू झाली आहेत.
खेड नातूवाडी धरणक्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांत १५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण ६८५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या तुलनेत खेड तालुक्यात पावसाची नोंद कमी असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आता पर्यंत १०० मिलीमीटर जास्त पावसाची नोंद झाली आहे. अगामी ४८ तासांत त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांपासून संततधार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख नद्या असलेल्या जगबुडी आणि नारंगी नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालकांची वाहन चालवताना दमछाक होत आहे. मुंबई – गोवा महामार्गाप्रमाणेच तालुक्यातील ग्रामिण भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे मासे खवय्यांनी शेताचे बांध, नदीकिनारी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून येत आहे. तर अतिवृष्टीमुळे नदी आणि ओढ्याच्या किनारी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.