तीर्थक्षेत्र माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात. देवीच्या दर्शनानंतर अनुसया देवीचे दर्शन देखील घेतात. श्री दत्त शिखर मंदिराच्या दक्षिणे बाजूस अनुसया देवीचे मंदिर आहे. हदगाव तालुक्यातील नामदेव वानोळे हे देखील अनुसया देवीच्या दर्शनासाठी जात होते. पायऱ्याच्या बाजूला बॉम्ब सदृश्य वस्तू होती. पायऱ्या चढत असताना त्यांचा हात बॉम्ब सदृश्य वस्तू वर पडल्याने अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर ते पायरीवर आदळले. त्याच्या हाताची तीन बोटे तुटून पडले. जखमी नामदेव उमाजी वानोळे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रानडूकराना हुस्कवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बारुदाचा हा स्फोट असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या स्फोटाबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र मंदिर परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेने व्यक्त केली नाराजी
माहूर येथे घडलेल्या या घटनेचा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. मंदिराच्या पायरीवर बॉम्ब आला कसा असा प्रश्न उपस्थित करत दानवे यांनी पोलिस प्रशासन आणि राज्य शासनावर टीका केली. पोलिस देखील निष्क्रियतेने काम करत आहे. माहूर येथील प्रकार पोलिसांनी स्पष्ट करावे, असे देखील दानवे यावेळी म्हणाले. सरकारला सुरक्षेचे काही घेणे देणे राहिले नाहीये. सरकार केवळ राजकारण करत असल्याचे देखील अंबादास दानवे म्हणाले.