• Mon. Nov 25th, 2024

    ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा नियुक्ती आदेश पत्र प्रदान

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2023
    ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा नियुक्ती आदेश पत्र प्रदान

    पंढरपूर, दि. 29 : ‘शासन आपल्या दारी’ योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आज अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात योजनेचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक लाभाचे वितरण करण्यात आले आहे.

    शासकीय विश्रामगृह येथील आयोजित या कार्यक्रमास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.

    यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे. शासनाने ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मंत्रीमंडळ बैठकीत नियमितपणे याचा आढावा घेण्यात येतो. ‘शासन आपल्या दारी” योजनेच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध दाखले देण्याचे काम होत आहे. योजना सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखलेही एकाच छताखाली मिळतात. सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत आहे. या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्य जनतेचे आहे. सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे आहे. वारी कालावधीत 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

    एक जानेवारी २०२३ पासून आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीतील गट क व गट ड संवर्गातील एकूण ५९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन अनुकंपा तत्त्वावरील उपलब्ध रिक्त जागांवर या नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

    कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तलाठी पदासाठी आठ उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग येथील कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर दोन शिपाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवर पाच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व तीन शिपायांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *