या घटनेबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील नयामाळ येथे सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचं शिरापासून धड वेगळं झालं. बिबट्याने महिलेला घरातून सुमारे ५० मीटर लांब फरफटत नेल्याची घटना घडली आहे. सरिता ऊर्फ सरिला वन्या वसावे (वय ३३ वर्ष ) असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला नयामाळ येथे कुडाच्या झोपडीत रात्री झोपली होती. पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने पुढील दरवाजा तोडत घरात प्रवेश केला आणि महिलेला घरातून बाहेर फरफटत नेलं.
बिबट्याने हल्ला केल्या त्यावेळी महिलेने आरडाओरड केली. मात्र, रात्रीच्या किर्र अंधारात घरात काय झालं, याचा कोणालाच अंदाज आला नाही. घडलेला प्रकार लक्षात येईपर्यंत बिबट्याने महिलेला फरफटत नेलं होतं. उजेड पडल्यावर सकाळच्या सुमारास सरिता यांचा मृतदेह घरापासून पूर्वेस सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावर एका शेताच्या परिसरामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात सरिता यांचं डोकं धडापासून वेगळं झालं होतं. डोक्याचा, उजव्या कानाचा भाग बिबट्याने पूर्णपणे नष्ट केल्याची दुर्दैवी घटना घडली. सरिता यांचं डोकं शरीरापासून ३० मीटर अंतरावर आढळून आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागूल यांच्यासह पोलीस नाईक अनिल पाडवी, तुकाराम पावरा यांचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी नरशा होण्या वसावे यांच्या खबरीवरून तळोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केदार अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये बिबट्याची दहशत आहे. वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा या तालुक्यात अति दुर्गम भागात बिबट्याच्या वावर असल्याच्या आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या घटना नेहमीच समोर येत असतात. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.