• Thu. Jun 11th, 2026

    आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात @विधानभवन’ कार्यक्रमाअंतर्गत योगासनांची प्रात्यक्षिके

    ByMH LIVE NEWS

    Jun 19, 2023
    आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात @विधानभवन’ कार्यक्रमाअंतर्गत योगासनांची प्रात्यक्षिके

     मुंबई, दि. 19 : यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी बुधवारी (दि.21) विधानभवनाच्या प्रांगणात योगासन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

    21 जून 2023 रोजी होणारा हा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती तसेच विशेष निमंत्रित म्हणून सर्व मंत्री, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विधिमंडळ सदस्यांसह सुमारे 2 हजार योगप्रेमी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 7 ते 9 यावेळेत ‘योगप्रभात @विधानभवन’ हा कार्यक्रम होईल.

    योगविद्या आणि ध्यानधारणा ही भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे. 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जगातील सर्वच देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा मुंबईतील विधानभवन येथे आयोजित करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक सदस्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. योगप्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शतकमहोत्सवी कैवल्यधाम, मुंबई या संस्थेचा विशेष सहभाग या उपक्रमासाठी लाभला आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed