• Tue. Jul 7th, 2026

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रदान

    ByMH LIVE NEWS

    Jun 14, 2023
    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रदान

    ठाणे, दि. 14 (जिमाका) :-  महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांना आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

    महिला व बालविकास विभागाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

    महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील काशीबाई एकनाथ जाधव, शोभा दीपक वैराळ, अनिता दळवी व सारिका भोईटे पवार यांना आज पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, दहा हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

    हिरकणी कक्षाचे उद्घाटन

    महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह, महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पोलीस आयुक्तालयात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामध्ये लहान मुले घेऊन येणाऱ्या महिला तसेच स्तनदा मातांचा समावेश असतो. या महिलांना त्यांच्या लहान मुलांना खाऊ घालणे व स्तनपानासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी या हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आरामाची सोय, पाण्याची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी आदींची सोय करण्यात आली आहे.

    यापूर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयातही हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील गर्दीच्या विविध सात ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed