रायगड-अलिबाग,दि.७(जिमाका) : बाहेर महापुराचे रौद्ररूप… चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा… मदतीच्या प्रतीक्षेत अडकलेले नागरिक… अशा अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने आणि बचाव पथकाच्या धाडसाने पेण तालुक्यातील ४६ नागरिकांना महापुराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मध्यरात्री जिल्हा नियंत्रण कक्षास मिळालेल्या एका संदेशानंतर सुरू झालेले बचावकार्य पहाटेपर्यंत अखंड सुरू राहिले आणि प्रशासनाच्या प्रभावी समन्वयामुळे दोन आव्हानात्मक बचाव मोहिमा यशस्वी ठरल्या.
पेण तालुक्यातील जिते गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून गावातील १६ नागरिक अडकले असल्याचा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षास रात्री २ वाजता प्राप्त झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नियंत्रण कक्षाने क्षणाचाही विलंब न करता हा संदेश पेणचे तहसिलदार तान्हाजी शेजाळ यांना दिला.
मध्यरात्रीचा संदेश मिळताच तहसिलदार तान्हाजी शेजाळ यांनी तातडीने बचाव यंत्रणा कार्यान्वित केली. आपदा मित्र अभिकेत म्हात्रे, राजेश म्हात्रे, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, तलाठी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन त्यांनी पहाटेच जिते गावाच्या दिशेने धाव घेतली.
अंधार, मुसळधार पाऊस आणि सर्वत्र पसरलेले पुराचे पाणी अशा कठीण परिस्थितीत बचाव पथकाने जिते गावात पोहोचून मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना धीर दिला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचाव पथकाने अत्यंत धाडसाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य राबविले. अखेर गावात अडकलेल्या सर्व १६ नागरिकांना पुराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले.
एक बचाव मोहीम संपताच दुसरे आव्हान…
जिते गावातील नागरिकांची सुटका करून बचाव पथकाने सुटकेचा निःश्वास टाकला न टाकला तोच मुंबई-गोवा महामार्गालगतच्या हॉटेल हिमगौरीला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून तेथे ३० व्यक्ती अडकल्याचा आणखी एक तातडीचा संदेश प्राप्त झाला.
एका आव्हानात्मक बचाव मोहिमेनंतर क्षणभरही विश्रांती न घेता तहसिलदार तान्हाजी शेजाळ यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथक पुन्हा नव्या मोहिमेसाठी सज्ज झाले. पथकाने तात्काळ हॉटेल हिमगौरीकडे धाव घेतली. हॉटेलच्या चोहोबाजूंनी पुराचे पाणी असल्याने आत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे अत्यंत कठीण होते. मात्र,परिस्थितीसमोर हार न मानता बचाव पथकाने दोरीच्या सहाय्याने सुरक्षित मार्ग तयार केला. पुराच्या पाण्याचा वेढा, पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करीत पथकाने अत्यंत संयमाने एकामागून एक अशा सर्व ३० व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढले. अखेर प्रत्येक नागरिक सुरक्षितस्थळी पोहोचल्यानंतर ही दुसरी बचाव मोहीमही यशस्वी ठरली.
समन्वय, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श…
जिते गावातील १६ आणि हॉटेल हिमगौरीमधील ३० अशा एकूण ४६ नागरिकांना महापुराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, पेणचे तहसिलदार तान्हाजी शेजाळ, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि आपदा मित्र यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे या दोन्ही बचाव मोहिमा यशस्वी झाल्या. संकटाच्या क्षणी जिल्हा नियंत्रण कक्षाने दाखविलेली तत्परता, प्रशासनाने घेतलेले वेगवान निर्णय आणि प्रत्यक्ष घटनास्थळी बचाव पथकाने दाखविलेले धाडस यामुळे ४६ नागरिकांचे प्राण सुरक्षित राहिले. महापुराच्या रौद्ररूपासमोर प्रशासनाची तत्परता आणि आपदा मित्रांचे धाडस भक्कमपणे उभे राहिले. संकट कितीही मोठे असले तरी योग्य समन्वय, तत्पर निर्णय आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर नागरिकांचे जीव वाचविता येतात, याचा प्रत्यय या दोन्ही यशस्वी बचाव मोहिमांनी दिला.
0000000000000000
महापुराच्या विळख्यातून ४६ जणांना मिळाले जीवनदान – महासंवाद
