• Sun. Sep 22nd, 2024

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ByMH LIVE NEWS

May 30, 2023
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादित यांच्यामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

या महामंडळामार्फत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या २० लाखापर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल.

यासाठी राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्जमर्यादा रक्कम रु. १० लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. २० लाख रूपये आहे.

यासाठी अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे असावे व तो इतर मागास वर्ग प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता आठ लाख रूपये पर्यंत असावी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. त्यासाठी अर्जदार इयत्ता १२ वी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६० टक्के गुणांसह पदविका (Diploma) उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरिता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. महामंडळ केवळ बँकेकडुन वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२ टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल. व्याज परताव्यासाठी जास्तीत जास्त ५ वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे

१.      अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला. (डोमिसाईल), अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड (दोन्ही बाजू), ज्या अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे, त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, अर्जदाराचा जन्माचा / वयाचा दाखला, शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र, शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Free ship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बँक खाते पुरावा.

अधिक माहितीसाठी www.msobefdc.org या संकेतस्थळास भेट द्या.

०००

  • संकलन – उपमाहिती कार्यालय, पंढरपूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed