• Mon. Nov 25th, 2024

    जिल्ह्यात मध उद्योग विकासासाठी मोठा वाव – रवींद्र साठे

    ByMH LIVE NEWS

    May 20, 2023
    जिल्ह्यात मध उद्योग विकासासाठी मोठा वाव – रवींद्र साठे

    सातारा दि. २०: जिल्ह्यात मध उद्योगास मोठा वाव असून मधाच्या गावांची संख्या आणखी वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

    महाबळेश्वर येथील मध संचालनालय येथे जागतिक मधमाशी दिवस  साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास वाई, महाबळेश्वर, खंडाळाचे आमदार मकरंद पाटील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, वाई प्रातांधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, कृषि सह संचालक बसवराज बिराजदार, अर्थ सल्लागार विद्यासागर हिरमुखे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह राज्यातील मध व्यवसायिक उपस्थित होते.

    मधाचे गाव ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री. साठे म्हणाले की, राज्य शासनाने मध उद्योगाच्या विकासासाठी सूमारे १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार राज्यभर मध योजना  राबविण्यात येणार आहे.

    आमदार श्री. पाटील म्हणाले की, सातारा जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून मोठी जैव विविधता लाभलेली आहे.  जिल्ह्यात वर्षाला ५० हजार किलो मधाचे संकलन होते.  भविष्यात यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

    मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिन्हा म्हणाल्या, मधमाशा पालन योजनेत मधपाळ, ५० टक्के स्वगुंतवणूक व ५० टक्के शासन अनुदान याप्रमाणे राबविण्यात येते.

    जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, कोयना व कांदाटी खोरे व पाटणसह  संपूर्ण जंगल भागातील गावे व कृषि क्षेत्रात मध उद्योगाचे जाळे निर्माण करावे.  यासाठी मंडळास शासनातर्फे सर्व ते सहकार्य करण्यात येईल.

    मधुमित्र व मधुसखी पुरस्कारांचे वितरण

    राज्यातील प्रगतीशील मधपाळ, मध व्यावसायिक, संशोधक यांना यावर्षीपासून खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधुमित्र व मधुसखी पुरस्कार देण्यास सुरवात केली आहे.  यंदाच्या वर्षी पहिला पुरस्कार पाटण तालुक्यातील सुळेवाडी येथील रोहिणी प्रकाश पाटील यांना प्रदान करण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार दिनकर विठ्ठलराव पाटील मु. लातूर रोड, ता. चाकूर,जिल्हा लातूर,  तृतीय पुरस्कार सुनिल चंद्रकांत भालेराव, मु. शाहापूर, जिल्हा अमरावती यांनी देण्यात आला.  तसेच नाशिकचे गजानन मोतीराम भालेराव, कोल्हापूरचे सचिन आनंदराव देसाई, महाबळेश्वरचे तुळशीराम अनाजी शेलार, पुण्याच्या सारिका अशोक सासवडे,  साताराचे सतीश शिर्के, कोल्हापूरच्या ज्योत्सना देसाई यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.

    यावेळी आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते जोर येथील ८ मधपाळांना सेंद्रिय मधाच्या रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच मध संचालनालय महाबळेश्वर येथील मध संग्रहालय, अद्यावत मध बॉटल फिलींग मशिनचे उद्घाटन व मधाचे गाव मांघरची माहिती पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed