• Tue. Nov 26th, 2024

    दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी!

    ByMH LIVE NEWS

    May 15, 2023
    दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी!

    नवी दिल्ली, १५ :  छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.

    या कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2023 दिल्ली यांच्यावतीने करण्यात आले. विचारमंचावर लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे,  विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.

    मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहासकालीन अनेक पैलूंचा उलगडा केला. माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ – मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र – कोकण व दक्षिण भारत हे कार्यक्षेत्र कसे होते याबद्दल त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले, आमच्या समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुद्धा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    प्रख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि त्यातून मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधून प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असून अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले. म्हणी वाक्यप्रचारातून त्यांनी आजच्या परिस्थितीवरही बोट ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

    विजय काकडे, कमलेश पाटील, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांचीही प्रबोधनपर भाषणे झाली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले,  शासनातर्फे साजरे करण्यात येणारे राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाच्या यादीमध्ये 14 मे हा दिवस  छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणून समाविष्ठ केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज  यांची जयंती साजरी करावी. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

    या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी आभार व्यक्त केले.

    कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सदन येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यासह या परिसरात असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदनाच्या आतील भागात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    00000

     

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *