त्यांना वाटत असेल की एमआयएममध्ये काही तरी ताकद आहे, तर त्यांनी ऑफर द्यावी, आम्ही सोबत यायला तयार आहोत. काय अटी शर्ती ठरवायच्या त्या एकत्र बसवू ठरवू, असेही जलील म्हणाले.
भाजपबद्दल बोलताना जलील म्हणाले, भाजपला हरविण्यासाठी जे काही बलिदान देण्याची गरज आहे, ते आम्ही द्यायला तयार आहोत. भाजपने देशात जाती धर्माच्या नावाखाली फूट पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की आता आपण कायमस्वरूपी पंतप्रधान राहू. मात्र, न्यूटनचा नियम आहे की जी वस्तू वर जाते, ती कधी ना कधी खाली येतेच. तसेच मोदीही एक दिवस खाली येणारच आहेत. मात्र, तोपर्यंत देशातील वातावरण खूपच खराब झालेले असेल. त्यामुळे भाजपच्या विरोधात एकत्रित लढा देण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटते, असेही जलील म्हणाले.
कालीचरण महाराज यांच्यावर जलील यांनी टीका केली. ते म्हणाले, भगवे कपडे घातले म्हणून कोणीही साधू होत नाही. अनेकदा गुन्हेगारही भगवे कपडे घालून घालून फिरताना दिसून येतात. त्यातील काहींना स्वामी, महाराज म्हणायला सुरवात झाली आहे. ज्यांना पाहून आपल्याला आदर वाटेल, त्यांना महाराज म्हणावे. मात्र, आसाराम बापू, कालीचरण यांची ही अवस्था आहे. त्यांची जागा तुरुंगातच आहे. मात्र, जेव्हा पोलिस राजकीय दबाव जुगारून काम करतील तेव्हा असे दहा कालीचरण आले तरी काही फरक पडणार नाही.