दरम्यान, दंगलीतील अनेक लोकांना अटक करण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं अकोला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल तसेच जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
दोन्ही गटातील लोकांचा मोठ्या संख्येने जमाव झाला होता. रात्री उशिरापर्यंत दगडफेक सुरूच होती. हरिहर पेठ भागात चारचाकी, रिक्षा, दुचाकी वाहनांची तोडफोड अन् जाळपोळ केली आहे. रात्री पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी अकोला पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली आहे.
परिस्थितीवर तात्काळ नियंत्रित मिळण्यात यश यावं, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला दिल्या. जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांकडून जमावांवर अश्रूधुराचा वापर करण्यात आला यासह अनेक प्रयत्न म्हणजे लाठीमारही करण्यात आला.
काल अमरावतीहून पोलीस दलाच्या तुकड्या हजर झाल्यानंतर रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सध्या अकोला पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. काल रात्रीच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानं अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, परिस्थिती नियंत्रणात आहे, असं आवाहन भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केलं आहे.
घटनास्थळी अकोला जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसेच पोलीस दाखल झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातून लवकरच पोलिसांच्या काही तुकड्या दाखल झाल्या. अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगेसह अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले, जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडेसह इतर अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
काल घडलेल्या संपूर्ण घटनेत आठ लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन पोलीस जखमी आहेत. आतापर्यंत २६ लोकांना अटक करण्यात आली आहे. समाजाविरोधात पोस्ट करणारा आरोपी देखील अटकेत आहे, अशी महिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
“दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. एका व्यक्तीने आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला. सद्यस्थितीत पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. पूर्ण जमाव रात्री उशिरापर्यंत पांगवण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून या घटनेत आतापर्यंत आमच्या माहितीनुसार एक मृत्यू झाला तर पाच लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी यावेळी केलं आहे. दरम्यान, सद्यस्थितीत पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.