कर्नाटकमधील काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी प्रसादरमाध्यमांशी संवाद साधताना सामान्य जनतेने खोकेवाल्यांचा केलेला हा पराभव आहे, असं त्याचं विश्लेषण केलं. लोकांना धाकात ठेवाल, दडपशाहीत ठेवायला जाल, तर लोक मतपेटीतून तुम्हाला उत्तर देतीलच, आज तेथील जनतेने भाजपचा पराभव करुन लोकशाही वाचवली असल्याचं राऊत म्हणाले.
कर्नाटकच्या भाजपच्या पराभवाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर बोलताना राऊत म्हणाले, फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे. त्यांच्या संगतीला असलेल्यांना राजकारण कळत नाही. काँग्रेसच्या विजयाचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल.
काँग्रेसच्या लाटेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो पराभव झाला, त्यावर बोलताना राऊत म्हणाले, खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीला जिंकता आलं नाही, भाजपा नतद्रष्ट आहे. तिथे प्रचाराला गेले नसते तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जिंकले असते. भाजपामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार हरले.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, जिथे जिथे प्रचाराला गेले, तिथे त्यांचे उमेदवार पराभूत झाले. म्हणजेच मोदी, शाह यांचा खुळखुळा आता चालणार नाहीत. २०२४ मध्ये मोदी सरकार जाणार हे मी फडणवीस यांना पैजेसकट सांगतो, असं चँलेंजही राऊत यांनी दिलं. त्याचवेळी बजरंगबली कर्नाटकच्या जनतेच्या बाजूला उभा राहिला, सत्याच्या बाजूने उभा राहिला. बजरंबलीलाच १४० जणांचं बळ मिळालं. गदा राहुल गांधींच्या खांद्यावर आहे, असं राऊत म्हणाले.