गडचिरोली जिल्हा म्हटलं तेथील नक्षलवाद्यांच्या कारवायांची चर्चा होते. मात्र, नक्षलवादी चळवळीला ठेचण्याचं काम
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीमधील तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक आणि लातूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केलं. त्यांनी तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करत नक्षलवाद्यांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या कारवाईने महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली आहे.
१२ नोव्हेंबर २०२१ रोजी १२० ते १३० शस्त्रधारी नक्षलवादी एकत्र येणार असल्याची गुप्त माहिती सोमय मुंडे यांना मिळाली. ते नक्षलवादी सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्याची योजना आखत होते. ही माहिती मिळताच सोमय मुंडे यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसोबत नक्षलविरोधी अभियानाची योजना तयार केली. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी साहा वाजता मरदुम टोलाच्या जंगलात धाड अभियान चालविण्यात आले, मात्र तेथील डोंगर माथ्यावरून अचानक पोलिसांवर नक्षलवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. या चकमकीत पोलीस नाईक टीकाराम संपतराव काटिंगे यांना एका हाताला आणि खांद्यावर गोळी लागल्याने ते जखमी झाले मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचा निश्चय केला अन् दुसऱ्या हाताने रायफल पकडुन धाडसाने शोर्य दाखवत त्यांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यामुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर आणखी जोरदारपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली.
घटनेचे गांभीर्य अन् सहकाऱ्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सोमय मुंडे यांनी पुढाकार घेत जिवाची बाजी लावली अन् शूरपणे सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला तसेच सहकाऱ्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता पोलीस हवलदार रवींद्र काशिनाथ नेताम् यांच्या सहकार्याने घटना स्थळीच योजना आखत आणखी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. तर पोलीस हवलदार रवींद्र काशिनाथ नेताम् यांनी जखमी सहकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोन नक्षलवाद्यांना ठार केले. या अंधाधुंद गोळीबारात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. जखमेतून मोठा रक्तस्त्राव सुरु झाला परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तेही हिंमत न हारता नक्षलवाद्यांवर तुटून पडले. दरम्यान सोमय मुंडे यांनी युद्ध कौशल्य वापरत आणखी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तब्बल नऊ तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत सोमय मुंडे यांनी नक्षलवाद्यांचं कंबरड मोडून काढले.
त्यांच्या या साहसी शौर्याबद्दल सोमय मुंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार रवींद्र काशिनाथ नेताम, पोलीस नाईक टीकाराम संपतराव काटिंगे यांना शौर्य चक्र पुरस्काराने महामहीम राष्ट्रपती मूर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती.पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.