• Mon. Nov 25th, 2024

    राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 30, 2023
    राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि. ३०: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी केले.

    राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे येथे हृदयमित्र प्रतिष्ठानच्यावतीने निसर्गोपचार भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी, हृदय मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.

    श्री. पाटील पुढे म्हणाले, निसर्गोपचार अत्यंत चांगला उपचार असल्याचा स्वतः अनुभव घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, कोरोना परिस्थितीने माणसाला वैद्यकीय उपचाराचे महत्व लक्षात आणून दिले. आज आजारांवरील उपचारांसाठी, औषधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हे पाहता निसर्गोपचार, प्राणायाम, मेडिटेशन, हीलींग उपचारपद्धती आदी पर्यायी उपचारपद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे. यातील उपचारांची, औषधांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रचार प्रसाराची गरज आहे. कोंढवा येथे होत असलेले राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे निसर्गोपचार रुग्णालय निसर्गोपचाराच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी म्हणाल्या, निसर्गोपचाराच्या प्रसारासाठी संस्था काम करत असून संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. चंद्रकांतदादा पाटील राज्याचे महसूलमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून संस्थेला अद्ययावत निसर्गोपचार रुग्णालयासाठी कोंढवा येथे २५ एकर जागा मिळाली आहे. लवकरच येथे २५० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. या आवारात ५०० बाह्यरुग्ण सुविधा, निसर्गोपचार महाविद्यालय तसेच प्राध्यापक, विद्यार्थी यांची निवासाचीही व्यवस्था असणार असून गुरुकुल मॉडेलप्रमाणे येथे काम चालणार आहे.

    इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार म्हणाले, देश विदेशात निसर्गोपचार, योगाचा प्रसार करण्याचे काम करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडूनही स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना, पर्यायी उपचार पद्धतींचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे.

    श्रीकांत मुंदडा यांनी प्रास्ताविकात हृदय मित्र प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. आजारांवर विविध उपचारपद्धतीच्या समन्वयातून उपचार करणे लाभदायक ठरते, असे ते यावेळी म्हणाले.

    कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते डॉ. अनंत बिरादार यांना निसर्गोपचार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed