• Fri. Nov 15th, 2024

    पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता – सहकार मंत्री अतुल सावे

    ByMH LIVE NEWS

    Apr 20, 2023
    पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता – सहकार मंत्री अतुल सावे

    मुंबई, दि. २० : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

    मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रस्तावित स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय परमाने, सहकार आघाडीचे दीपक पटवर्धन, पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    सहकार मंत्री श्री.सावे म्हणाले की, राज्यातील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधीमुळे हे शक्य होणार आहे. डीआयसीजीसीच्या धर्तीवर नागरी सहकारी बँकांतील ठेवींना ज्याप्रमाणे संरक्षण आहे त्याच पध्दतीने राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण शक्य होईल. पतसंस्थांच्या बाबतचा विश्वास वाढेल आणि सहकारातुन समृध्दी हे ध्येय गाठता येईल.

    या बैठकीत पतसंस्थांच्या प्रतिनिधीनी मांडलेल्या सूचना व हरकती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सूचनांचा सकारात्मक विचार करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल, असे सांगून  आणखी काही सूचना असतील तर लेखी कळवावे, असे आवाहनही सहकार मंत्री श्री. सावे यांनी यावेळी केले.

    000

    काशीबाई थोरात/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed