शुभम गुढेकर, तुषार गावडे यांचे कुटुंबीय भावूक
खासगी बसचा अपघात झाल्यानंतर जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर, इतर प्रवासी जखमी झाले होते. यापैकी शुभम गुढेकर आणि तुषार गावडे हे त्यांच्या दिंडोशीतील घरी टॅक्सीनं पोहोचले. अपघातानंतर उपचार घेऊन मुलं घरी पोहोचताच त्यांची आई भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला
तुषार गावडे काय म्हणाला?
पिंपरी चिंचवड मधून निघाले त्यावेळी आम्ही चालकाला बस कमी वेगात चालवा, असं सांगितलं होतं. त्यांना ती सूचना देऊन आम्ही झोपलो होतो, असंही तो म्हणाला. अपघातानंतर बेशुद्ध पडल्याचं देखील त्यानं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घटनास्थळाला भेट
एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी एमजीएम रुग्णालयात जखमींशी संवाद साधला. या पघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात
पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४० ते ४५ जण गंभीररीत्या जखमी झाले तर १३ जणांचा मृत्यू झाला. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खोल दरीत कोसळून अपघात झाला.