बुलडाणा : जिल्ह्यातील पारस येथील श्री बाबुजी महाराज संस्थानात रविवारी रात्री घडलेल्या घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला तर जवळपास २३ जण जखमी झाले. मृतांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील एका ६५ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. गावातील महिला दु:ख निवारणासाठी दरबारात जात असल्याने ६५ वर्षीय महिला देखील दरबारात गेली पण रविवारी अनर्थ घडला.अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्री बाबूजी महाराज संस्थान आहे. या संस्थानात दर रविवारी दु:ख निवारण दरबार भरतो. रविवारी येथे दरबारासाठी भाविक मोठ्या प्रमाणात एकत्र जमले. दरम्यान, साडेसात वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याने कडूलिंबाचे भलेमोठे झाड पत्र्याच्या सभामंडपावर कोसळले. यात ठार झालेल्या सात भाविकांमध्ये खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील महिलेचा समावेश आहे.
या महिलेची रविवारी उशिरा रात्री ओळख पटली. भालेगाव येथून दरबारासाठी सहकारी काही महिलांसह पारस येथे गेल्या असता ही घटना घडली. मृतक महिलेची ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा सुन, नातवंड असा आप्त परिवार असून, भालेगाव बाजार, कुंबेफळ येथील वार्ताहर गजानन सुशीर यांच्या त्या मातोश्री होत्या.दरबारात नियमित हजेरी
पारस येथे श्री बाबूजी महाराज संस्थानामध्ये दर रविवारी दु:ख निवारण दरबारात हजेरी लावण्यासाठी खामगाव तालुक्यातील विविध गावांतील महिला जात. कालही खामगाव तालुक्यातील भालेगावसह कुंबेफळ, टाकळी तलाव, ढोरपगाव येथील काही महिलांनी हजेरी लावली होती.