राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत आमदार पाटील गटाने अर्ज भरले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा ही आमची भूमिका आहे. बारा हजार सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत. ही लढाई अनाधिकृत ६०० सभासद विरोधात १२ हजार अधिकृत सभासदांत आहे. ती महाडिक आणि पाटील अशी नाही.’ महाडिक कुटुंबीयांनी राजाराम कारखान्याची काय प्रगती केली? असा सवाल करून ते म्हणाले, ‘काय केलं हे सांगण्यासारखं नसल्यानेच महादेवराव महाडिक प्रचारासाठी बाहेर पडत नाहीत. कारखान्यात केलेल्या भ्रष्टाचाराला सभासद कंटाळले आहेत. या कारखान्यात महाडिक यांची हुकूमशाही चालते, ती थांबवून एकदा कंडका पाडायचा आहे.’
सतेज पाटील यांच्या आरोपाला प्रत्यूत्तर देताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘राजाराम कारखान्याचा कारभार हुकूमशाही पद्धतीने नव्हे तर सर्वांना बरोबर घेऊन सुरू आहे. तो १२२ गावातील सभासदांच्या मालकीचा आहे. हेच सभासद ‘सहकार टिकवायचा आहे’ असे म्ह्णत निवडणुकीत उतरले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कारखान्याचे नेतृत्व करताना सभासदांना न्याय दिला. तब्बल २७ वर्षे नेतृत्व करताना त्यांनी हा कारखाना सभासदांचा ठेवला, त्याचे खाजगीकरण केले नाही. शेतकरी सभासदांना सन्मानाची वागणूक दिली. याउलट पाटील यांच्या डॉ. डी.वाय. पाटील कारखान्यातच हुकुमशाही आहे. एका रात्रीत तेथील पाच हजार सभासद कमी का केले ? सभासदांना त्यांच्या हक्काची साखर मिळते का ?, या प्रश्नांची उत्तरे आमदार पाटील यांनी द्यावीत. कारखान्याच्या कारभाराविषयी कोठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत.’
महाडिक म्हणाले, राजाराम कारखाना हा १२२ गावातील सभासदांचा आहे. त्याचे सर्व सभासद आमच्या सोबत आहेत. आमच्या विरोधकांना कारखान्याचे सभासद नेमके किती हे सुद्धा माहित नाही. ते बारा हजार विरुद्ध सहाशे सभासद अशी लढाई असल्याचे सांगत आहेत असा टोलाही त्यांनी मारला.
पत्रकार परिषदेला माजी आमदार महादेवराव महाडिक, विद्यमान चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, मुडशिंगीचे तानाजी पाटील, भास्कर शेटे आदी उपस्थित होते.