मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायेत. विशेषत: तुमच्याच मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले, “शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहे”
माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही. वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही सत्तार यांनी सांगितलं.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय ५५ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीये. अशोक भिका शिरसाट असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. दुसऱ्या घटनेत कर्जबाजारीपणाला कंटाळून खुलताबादच्या दरेगाव आणि वैजापूरच्या बेंदवाडीच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटनाही समोर आलीये. शंकर अंबादास गायकवाड (वय ३५ वर्षे) आणि राजूसिंग लालसिंग बेडवाळ (वय ४० वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत. आता सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सुरज उदयसिंग सेवगन ( वय 25 वर्षे) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.