• Tue. Nov 26th, 2024

    छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा सुवर्ण क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Feb 19, 2023
    छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा सुवर्ण क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    आग्रा (उत्तर प्रदेश) येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती आज साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन, आर. आर. पाटील फाउंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उत्तर प्रदेशचे विधी एवं न्याय मंत्री श्री. उपाध्य, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय विधी राज्यमंत्री एस. पी. सिह बघेल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, प्रशांत बंब, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, सतीश चव्हाण‌ आदी मान्यवर उपस्थित होते.

    लाल किल्ल्यात शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते. शिवरायांनी याच किल्ल्यात औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते. येथून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप सुटले होते. या ऐतिहासिक लाल किल्ल्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणे हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

    मुख्यमंत्री म्हणाले की, मी आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलो आहे. आजचा दिवस अवघ्या महाराष्ट्रासाठी रोमहर्षक आहे. शिवरायांनी मोगल, आदिलशाही, निजामशाहीच्या अत्याचाराच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आजही शिवाजी महाराज हे सदैव मार्गदर्शक आहेत. शिवराय हे कुशल संघटक आणि राजनीतिज्ञ होते. शिवाजी महाराज म्हणजे दैवी शक्तीच. त्यांना केवळ साम्राज्य बनवायचे नव्हते तर रयतेचे कल्याण करायचे होते. स्वातंत्र्याचे बीज त्यांनी रोवले.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र आणि हिंदुस्तानचे दैवत म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबास महाराजांनी याच दिवाण – ए – खासमध्ये आपले तेज दाखवून दिले होते. तेथेच आज शिवजयंती साजरी होत आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. मराठीजनांच्या जीवनातील हा रोमांचक क्षण आहे. आतापासून दरवर्षी येथे शिवजयंती साजरी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या संदेशाचे यावेळी प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी केली.

    कार्यक्रमात नितीन सरकते हंसराज, वैशाली माडे यांचे गायन, शिवबा पाळणा गायला गेला. शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सॅन्ड कलेच्या माध्यमातून सर्वम पटेल या कलाकारांनी मांडला. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर लघुनाटक सादर करण्यात आली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed