• Tue. Nov 26th, 2024

    बचत गट स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांचे महत्त्व रुजण्यास मदत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 13, 2023
    बचत गट स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांचे महत्त्व रुजण्यास मदत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    महिला बचत गट उत्पादने ब्रँडिगसाठी डीपीसीमधून आर्थिक निधीची तरतूद करण्याची ग्वाही

    सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्यास व रूजण्यास मदत होईल. महिला बचत गटांच्या उत्पादनाचे ब्रँडिग होणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आर्थिक निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन भवन आवारात महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलला भेटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषि उपसंचालक श्री. मोरे आदिसह अन्य मान्यवर, महिला बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होत्या.

    नियोजन भवन आवारात लागलेले स्टॉल – गौरी सोहम गृह उद्योग माळीनगर (ता. माळशिरस) (रागी, ज्वारी, बाजरीचे कुकीज), सिद्धशोभा ज्वारी प्रक्रिया युनिट कुंभारी (ता. द. सोलापूर) (ज्वारी रवा, डोसा, इडली), गणेश तानाजी गुंड औंढी (ता.मोहोळ) (ज्वारी कडक भाकरी), शंतनु पाटील बार्शी (ज्वारी पोहे, चिवडा, बिस्कीटे, नाचणी बिस्कीटे), प्रियदर्शनी महिला बचत गट अक्कलकोट (ज्वारी, बाजरी, नाचणीपासूनचे कुकीज)

    ट्रॅक्टरचे वितरण

    दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. यामध्ये उत्तम साठे, किसन साठे, अभिजीत मनसावले, श्रीमती वैशाली सरवळे, यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.  तसेच, नव्याने ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दत्तात्रय कोंडीबा दोडतले (औज- आहेरवाडी), शशिकला अप्पासाहेब लाळसंगे (मंद्रुप) उत्तर सोलापूर तालुक्यातील सखुबाई अच्युत कोकाडे, अकोलेकारी, प्रियंका देविदास लामकाने अकोलेकारी आणि अभिमन्यु विभुते, नानज यांना ट्रॅक्टरकरिता तर सरिता धोंडीबा खराडे (मंद्रुप, ता. द. सोलापूर) यांना पेरणी यंत्राकरिता पूर्व संमती पत्र वाटप करण्यात आले.

    दरम्यान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत भिंतीपत्रकाचे पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

    आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त   नियोजन भवन आवारात उभारण्यात आलेल्या सेल्फी पाईन्टवर पालकमंत्री यांनी सेल्फी काढली.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed