नंदुरबार, दि.२५ (जिमाका वृत्तसेवा): चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची बी-एफ-7 च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
‘कोविड-१९’ पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.रविदास वसावे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, मागील लाटेदरम्यान नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आले असले, तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामधील आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. सर्व ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड्स, पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय साधनसामग्री, आरटीपीसीआर किट, ॲन्टीजन किटची मागणी आदींचे आतापासूनच नियोजन करावे. आरोग्य विभागाने लक्षणे असलेल्या संशयीत रुग्णांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे. नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. अद्यापही ज्या नागरिकांनी पहिला, दुसरा व बुस्टर डोस घेतला नसेल त्यांनी त्वरित डोस घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी मागील वर्षातील कोविड रुग्ण, ऑक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर, औषधसाठा, लसीकरण तसेच प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस तहसलिदार, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000