नागपूर, दि. 22 : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सुयोग पत्रकार निवासस्थानी भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
सुयोग येथील सभागृहात झालेल्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजना, विकासकामांच्या नियोजनाची माहिती दिली. सुयोग शिबिरप्रमुख विवेक भावसार व माध्यम प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, घरांची वाढलेली संख्या, गावे-शहरांचा विस्तार पाहता रस्त्यांची लांबी वाढली आहे. गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी निधीची गरज असते. निधीचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी धोरणात बदल करणे आवश्यक आहे. तसे धोरण अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्यात येत आहे.
राज्यातील रस्त्यांची स्थिती आणि दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक प्रयत्न, कोकणातील, तसेच इतर विभागांतील रस्ते, धोरणात्मक निर्णय आदी बाबींविषयी चर्चा झाली. त्यानंतर मंत्री श्री. चव्हाण यांनी सुयोग येथील विविध कक्षांना भेट देऊन सुविधांची पाहणी केली.