• Fri. Nov 15th, 2024

    व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    ByMH LIVE NEWS

    Dec 21, 2022
    व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    नागपूर, दि. 21 : युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. हीच युवा पिढी आज व्यसनाधीन होत असतांना दिसत आहे. युवापिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढून नशामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्गदर्शनात राधिका क्रीएशन नागपूर प्रस्तुत ‘‘मोहजाल’’ या  नाटिकेचा 25 वा प्रयोग आज 21 डिसेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आला.

    यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, डॉ. मंगेश वानखेडे, भरत केंद्रे, नागपूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशात आज युवावर्गामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. अंमली पदार्थ सेवनाच्या अतिआहारी जाऊन काही जणांनी आत्महत्या केल्याचे बघितले आहे. आपल्या देशातील युवा पिढी अंमली पदार्थाच्या सेवनातून मुक्त झाली पाहिजे. युवा पिढी व्यसनापासून दूर राहावी. यासाठी अशाप्रकारच्या प्रबोधनात्मक जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी केले.

    भारतीय संस्कृती ही माणसाला माणूस बनविणारी आहे. जे व्यसनाच्या आहारी गेले त्यांनाही प्रेम आणि आपुलकीने व्यसनमुक्त करण्याचे काम युवा पिढींने करावे, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

    ‘‘मोहजाल’’ नाटिका अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवक – युवतींवर आधारित आहे. 30 मिनिटाच्या या नाटिकेतून युवावर्ग अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात कसा गुरफटला जात आहे. याचे जिवंत चित्रणच मांडण्यात आले आहे. युवावर्ग अंमली पदार्थाच्या आहारी जात असताना पालक आणि समाजाच्या संदिग्ध भूमिकेवरही नाटिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या पाल्यांशी कशाप्रकारचा व्यवहार केला पाहिजे, याचे प्रबोधन करण्यात आले आहे.

    नाटिकेचे लेखक प्रसन्ना शेंबेकर, दिग्दर्शक संजय पेंडसे आणि निर्मिती प्रमुख सारिका पेंडसे व डॉ.रवी गिऱ्हे यांची आहे. या नाटिकेमध्ये 25 युवक-युवतींचा सहभाग असून हे सर्व जण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातंर्गत येणाऱ्या नागपूर येथील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पेंडसे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपालांनी नाटिकेत सहभागी सर्व कलावंतांचे, दिग्दर्शक, लेखक व निर्मिती प्रमुख यांचे कौतुक केले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed