• Fri. Nov 15th, 2024

    हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

    ByMH LIVE NEWS

    Dec 21, 2022
    हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

    नागपूर, दि. २१ : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला.

    विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात  आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

    याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲपची निर्मिती करणाऱ्या सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    ‘महा असेंब्ली’ अॅपद्वारे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. या अधिवेशन काळात प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून पुढील काळात नवनवीन सुविधायुक्त असे ॲप उपलब्ध होणार आहे.

    अॅपचे सादरीकरण राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून त्यांनी या संकल्पनेचे व अॅपचे कौतुक केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अॅपचा आढावा घेऊन हे अॅप महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

    अॅपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल या अॅपच्या निमित्ताने जगासमोर आले आहे.

    अथक परिश्रम घेऊन सेटट्राईबच्या विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसात परिपूर्ण असे अॅप तयार करून ते कार्यान्वित केले असून त्यांना महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे श्री.वाकोडीकर म्हणाले.

    ००००

    इरशाद बागवान/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed