• Sat. Nov 16th, 2024

    समृद्ध समाजाच्या निर्मितीत संतपीठाची भूमिका महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Dec 9, 2022
    समृद्ध समाजाच्या निर्मितीत संतपीठाची भूमिका महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    संत साहित्य अभ्यासक्रम प्रमाणपत्राचे वितरण

    औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : संतपीठामध्ये शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमधून अनेक विद्यार्थी घडणार आहेत. त्यामुळे समृध्द समाजाच्या निर्मितीमध्ये संतपीठाची भूमिका महत्वाची असून येथील सुविधासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले.

    पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील बोलत होते.

    यावेळी पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेद्रं देवळाणकर, प्र-कुलगुरु डॉ.श्याम शिरसाट यांच्यासह संतपीठात विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांची उपस्थिती होती.

    संतपीठाच्या पायाभूत सुविधासह इतर उपक्रमासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठासाठी सामाजिक दायित्व निधी (CSR) च्या माध्यमातून देखील निधी उभा करण्याची सुचना श्री पाटील यांनी केली.

    12 व्या शतकानंतर भारत देशावर परकीय आक्रमाणामुळे समाज विखुरला गेला होता. असे असताना संताच्या शिकवणीतून भारताला स्थिरत्व, आत्मविश्वास आणि संस्कारी जीवन पद्धती मिळाली. यातून मानवेतेचे वैश्वीक संदेश दिला गेला. तो वारसा संतपीठ पुढे नेईल. खऱ्या जीवनाचे सार समाधानी जीवन आहे. संत साहित्यातून समाजासमोर आणखी व्यापक स्वरुपात ते येईल असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

    पालकमंत्री श्री.भुमरे यांनी संतपीठाच्या वसतीगृह व इतर इमारतीची दुरुस्ती व इतर सुविधासाठी दोन कोटी रुपयापर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समिती मधून देणार असल्याचे सांगितले. तसेच इतर अभ्यासक्रम व अनुषांगिक कामासाठी शासनाकडे पाठवलेला निधीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री यानात्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed