औरंगाबाद, दि.9 (जिमाका) :- मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. वंदे मातरम सभागृहाच्या माध्यमातून या कार्याची माहिती होणार असून वंदे मातरम् सभागृह विकास कार्यात कार्यरत चळवळीचे केंद्र व्हावे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
किलेअर्क येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते वंदे मातरम् सभागृहाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात अनेकांनी आपले बलिदान दिले. शासकीय ज्ञान, विज्ञान महाविद्यालयातील तरूणांनी वंदे मातरम् या घोषणा देत आंदोलनाला सुरूवात केली होती. त्याचठिकाणी उभारण्यात आलेले वंदे मातरम् सभागृह कायम प्रेरणा देणारे ठरेल.
वंदे मातरम् सभागृह उत्तम पध्दतीने चालविण्याबरोबरच याठिकाणी सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रम व्हावेत तसेच आज याठिकाणी होत असलेली राष्ट्रीय, शैक्षणिक धोरणासंबंधी कार्यशाळादेखील महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वातंत्र्य लढयात ज्यांनी योगदान दिले. अशा हुतात्म्यांचे कार्य नवीन पिढीला माहिती व्हावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याबाबतचा समावेश करण्याबाबत विचारमंथन केले जाणार आहे.
जगभरात योग, विपश्यना तसेच भारतीय संस्कृतीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी भारतात येतात. अमेरिकेच्या 22 विद्यापीठाचे कुलगुरु नुकतेच याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत येऊन गेले आहेत. योग व विपश्यना याबाबीनाही महत्वाचे स्थान यापुढेही असणार आहे.
सहकार मंत्री श्री.सावे म्हणाले की, वंदे मातरम सभागृहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकाबद्दलची माहिती नवीन पिढीला मिळणार आहे. सर्व सुविधाने परिपूर्ण असणाऱ्या या सभागृहात विविध उपक्रम होतील. हे सभागृह नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
विरोधी पक्षनेते अंबादास म्हणाले की, वंदे मातरम सभागृहाचा इतिहास विसरता येणार नाही. वंदे मातरम चळवळीप्रमाणे या वास्तूचा उपयोग करावा. तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने भरीव निधी द्यावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्तविकात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्मृतीचे जतन करण्यासाठी वंदे मातरम सभागृह महत्वपूर्ण ठरणार आहे. 43 कोटी रुपयांचा निधी खर्च करुन उभारण्यात आलेल्या या सभागृहामुळे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, सिडकोच्या मुख्य प्रशासक दिपा मुधोळ-मुंढे, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षण संचालक डॉ. शेलेंद्र देवळाणकर, सहसंचालक सतीश देशपांडे, शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सातपुते आदि उपस्थित होते.