• Sat. Nov 16th, 2024

    ‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’चे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या उद्घाटन

    ByMH LIVE NEWS

    Dec 9, 2022
    ‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’चे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या उद्घाटन

    मुंबई, दि. ९ : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी  ११ वाजता होणार आहे.

    हा ग्रंथोत्सव वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज जवळ कम्युनिटी हॉल येथे होणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार ॲड. अनिल परब, ॲड. आशिष शेलार, झिशान सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी  निधी चौधरी, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

    दुपारी १२ ते १ या वेळेत ‘आनंदयात्रा’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २ ते ३ या वेळेत दीपाली केळकर यांचा हास्य संजीवनी हा कार्यक्रम होईल. ३ ते ४ या वेळेत उद्योजकता आणि स्टार्टअप विकास या विषयावर प्रा. एस.आर.कस्तुरे यांचे व्याख्यान होईल. दुपारी४ ते ५.३० या वेळेत महेश केळुसकर यांचे २१ भारतीय भाषातील अनुवादित कवितांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये डॉ.विजय चोरमारे, सतीश सोळांकूरकर, प्रतिभा सराफ, प्रज्ञा दर्भे यांचा सहभाग राहील.

    ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत मुलांसाठी कथाकथन स्पर्धा होणार आहे.सकाळी ११ ते १२ या वेळेत श्याम जोशी यांचे ‘मराठी पुस्तक आणि वाचन संस्कृती’ या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच दु. १२ ते १ या वेळेत ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ या विषयावर गौरव सोमवंशी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ३ या वेळेत ‘माझा साहित्यप्रवास’ या विषयावर डॉ.संगीता बर्वे यांचे व्याख्यान,दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रविण दवणे यांचे ‘वाचनाची आनंदयात्रा’ यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४ ते ५ या वेळेत ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर प्रफुल्ल वानखेडे यांची सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक राहूल गडपाले हे मुलाखत घेणार आहेत.

    सायंकाळी ५ ते ६.३० वाघूर दिवाळी अंकाचे संपादक नामदेव कोळी, संतोष शेळके, अविनाश सावंत, प्रदीप कोकरे, प्रियांका तुपे, स्वप्नील जाधव, विशाखा विश्वनाथ, काजल बोरस्ते, सचिन शिंदे, संजय पवार यांचे कवि संमेलन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed