मुंबई, दि. 8 : व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा असावा, निर्भिडता असावी, राष्ट्रभाव असावा. परंतु खोडसाळपणा नसावा, असे सांगताना पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन तसेच पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 7) राजभवन येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांनी संघटनेच्या सदस्यांना संविधानाच्या कक्षेत काम करण्याची तसेच पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रतिज्ञा दिली.
पत्रकारिता करणे म्हणजे धारदार शस्त्रावर चालण्यासारखे कठीण काम आहे, असे सांगून आज डिजिटल माध्यमे व समाजमाध्यमे आल्यामुळे माध्यमांचा सदुपयोग तसेच दुरुपयोगदेखील होताना दिसतो, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले. माध्यम प्रतिनिधींनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करण्याची जी प्रतिज्ञा केली तशीच प्रतिज्ञा देशातील सर्व नागरिकांनी घेऊन त्यांनी देखील देशासाठी समर्पित भावनेने काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना 21 राज्यात पसरली असून 18 हजार माध्यम प्रतिनिधी संस्थाना जोडले गेले असल्याचे संस्थापक संदीप काळे यांनी सांगितले. संस्थेची केवळ संख्यात्मक वाढ न करता संस्थेच्या माध्यमातून सक्षम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मल्टीमीडियामध्ये काम करणारी पत्रकारांची चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.
कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला तसेच संस्थेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
००००
Maharashtra Governor inaugurates website of Voice of Media
Mumbai 8 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the website launch and Induction Ceremony of office bearers of ‘Voice of Media’ a nationwide organisation of media persons at Raj Bhavan Mumbai on Wed (7 Dec). The Governor gave the pledge of upholding the Constitution and preserving the values of journalism to the members on the occasion.
Founder of ‘Voice of Media’ Sandeep Kale, National General Secretary Chandramohan Puppala, State President Raja Mane and members of the National and State executive of the organisation were present.
Speaking on the occasion, the Governor asked media persons to uphold the values of journalism and shun sensationalism and emotionalism.
0000