मुंबई, दि. 7 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व यवतमाळ नगरपरिषदेमध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला. याप्रसंगी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.), संचालक (संचलन) वि. न. काळम-पाटील, दीपक म्हैसेकर, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, प्रकल्प संचालक सुभाष नागे, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलहरकर उपस्थित होते.
या कराराअंतर्गत महाप्रित कंपनी यवतमाळ नगरपरिषदेच्या जमिनीवर निवडलेल्या लाभार्थींसाठी २ हजार ७५३ घरे बांधून देणार आहे. महाप्रितच्या निरीक्षण व देखरेखीखाली एजन्सीद्वारे ही घरे बांधली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण १५.७० हेक्टर जमिनीवर २ हजार ७५३ सदनिका बांधल्या जाणार आहेत.
या योजनेसाठी महाप्रित प्रकल्प नियंत्रण करणारी संस्था (PMA) म्हणून काम पाहणार आहे. प्रकल्पांचे नियोजन, संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी महाप्रितची राहील. या प्रकल्पासाठी अंदाजे २५० कोटी इतका निधी लागणार आहे. त्यासाठी ‘महाप्रित’च्या प्रयत्नाने वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.
हा प्रकल्प राबविण्यासाठी महाप्रितकडून कमी किंमतीत पर्यावरणास अनुकूल, हरित व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, फ्लाय ऍश आधारित काँक्रिट व ब्रिक्स वापरून बांधकाम करण्यासाठी मदत होणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल. हा प्रकल्प शक्यतो मागासवर्गीय समाजातील उद्योजक, स्टार्टअप तसेच वेगवेगळी बांधकामे जसे की, ब्रिक्स वर्क, प्लास्टर, टाईल्स बसविणे, प्लम्बिंग, इलेक्ट्रिफिकेशन, लॅन्डस्केप, पायाभूत सुविधा आदी कामे मागासवर्गीय कंपन्या, उपकंपन्या, ठेकेदारांकडून करून घेण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील मागासवर्गीय तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगार मिळणार आहे.
अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. त्यासाठी महाप्रित कंपनीने सामाजिक न्याय व नगरविकास विभाग, आमदार मदन येरावार व यवतमाळ नगरपरिषदेचे आभार मानले आहेत.
0000
संध्या गरवारे/विसंअ