• Wed. Nov 27th, 2024

    अत्याधुनिक सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी मिळेल – पालकमंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 4, 2022
    अत्याधुनिक सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी मिळेल – पालकमंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.) – टेलिमेडिसिनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘रेमिडी सोल्युशन किट’च्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी मिळेल. तसेच या नवीन सुविधेचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले.

    राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद‌्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी यादृष्टीने पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” चा शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाला. यावेळी माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, या जिल्हयातील जो ग्रामीण भाग आहे आणि तिथे असणारे पीएचसी सेंटर्स आणि तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या ही फार मोठ‌्या प्रमाणामध्ये आहे. या रुग्ण संख्येच्या तुलनेत डॉक्टर्स उपलब्ध करुन देणं हे सरकार समोर मोठं आव्हान आहे.

    प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये डिजिटलायझेशच्या दिशेने प्रगतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या माध्यमातून शहरांमध्ये असणारे काही चांगले डॉक्टर्स (विशेषतज्ञ) हे या ठिकाणी सेवा द्यायला तयार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही अशी सेवा चांगल्या डॉक्टरांच्या मुळे उपलब्ध व्हायला लागली आहे. त्यामुळे, ही रुग्णसेवा इथे असलेल्या गरजू रुग्णांना देण्यात येत असून या व्यवस्थेमध्ये रुग्णांना होणारा उपचाराचा खर्च आणि औषधांचा खर्च कमी होण्याकरिता जेनेरिक मेडिसिनचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात कसा होईल यासाठी सुध्दा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

    टेलिमेडिसिनचा संपूर्ण कंसेप्ट हा माणगाव व बांदा या दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर अंमलात आणण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे, असे सांगतानाच पालकमंत्री श्री.  चव्हाण म्हणाले, सिंधुदूर्ग मधील सर्व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा व येथील 38 गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी एक हेल्थ केअर किट उपलब्ध करून घ्यावे. हा खर्च काही फार मोठा नाही. आणि हा खर्च उचलण्यासाठी प्रत्येकाने जर थोडा-थोडासा हातभार लावला तरी डिजिटलाजेशनच्या माध्यमातून आरोग्याची नवीन व्यवस्था या पूर्ण जिल्हयामध्ये सुरु होईल. त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले.

    आपण सर्वांनी या सुविधेचे प्रात्यक्षिक देखील पाहिलेलं आहे. त्यामुळे ही एक चांगली व्यवस्था या टेलिमेडिसिनच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुदूढ होऊ शकेल असा विश्वासही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदी उपस्थित होते.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed