• Fri. Nov 15th, 2024

    सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 18, 2022
    सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन – महासंवाद

    पुणे, दि.१७: सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजातील गरजू व्यक्तींना मदत करावी आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन कल्पना सूचवाव्यात, असे आवाहन  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी  केले.

    पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर,  रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे  आदी उपस्थित होते

    पुरस्कारप्राप्त गणेश मंडळाचे अभिनंदन करुन श्री. पाटील म्हणाले, कोरोना संकटानंतर सार्वजनिक उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गणेशोत्सव उत्साहाने आणि शांततेत साजरा करण्यात पोलीसांसोबत मंडळांची भूमिका महत्वाची आहे. गणेशोत्सवाप्रमाणे दिपावलीच्या काळात सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

    पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण असल्यामुळे नागरिकांना निर्भयपणे संचार करता येतो, बेरोजगारांना रोजगार मिळतो. त्यामुळेच हे शहर कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठीचे उत्तम शहर म्हणून ओळखले जाते.

    पुणे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पोलिस आस्थापना पायाभूत सुविधा योजनेतून पोलीसांसाठी वाहने खरेदीसाठी २ कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सण-उत्सव साजरे करताना नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

    पोलीस आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्बंध होते. यावर्षीचा गणेशोत्सव गणेश मंडळांच्या  सहकार्यामुळे उत्साहात साजरा केला.  पुण्यात शांतता व सुव्यवस्था  राखण्यासाठी यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

    पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ अंतर्गत पाच पोलीस परिमंडळातील विविध गणेशमंडळांना सजावट व मिरवणूकीचे मार्ग या गटात बक्षीस वितरित करण्यात आले.

    पुणे पोलिसाचा कामगिरीवर आधारित ‘@ पुणे’ या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed