• Fri. Nov 15th, 2024

    सेवेतून विश्वास निर्माण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Oct 7, 2022
    सेवेतून विश्वास निर्माण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अकोला,दि.7 (जिमाका)- पोलीस स्टेशन हे जनतेचे कार्यालय असून प्रत्येक नागरिकांचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. या इमारतीत प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकले जावे, त्याच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण व्हावे, असा विश्वास आपल्या सेवेतून निर्माण करावा,अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

    पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ.रणजीत पाटील, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आदी उपस्थित होते.

    श्री.फडणवीस म्हणाले की, पोलीस विभागाचे कार्यालय हे जनतेचे कार्यालय आहे. प्रत्येक सामान्य नागरिकांना न्याय मिळेल अशी व्यवस्था तेथे निर्माण करावी. याकरीता पारदर्शकता, प्रकरणांचा तातडीने निपटारा व नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करावा. आपण जनतेचे सेवक असून त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.  तसेच कायदा व सुव्यवस्था बाधीत करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर  संपूर्ण इमारतीची पाहणी केली.

    नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयः या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 4289.87 चौ.मीटर असून इमारतीमध्ये पोलीस अधीक्षक कक्षासह, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज कक्षांचे निर्माण करण्यात आले आहे. या इमारतीच्या बांधकामास 10 कोटी 80 लक्ष 85 हजार 151 रुपये खर्च करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed