ठाणे, दि. 3 (जिमाका) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहरातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले. तसेच मॉडेल मिल कंपाऊंड येथील रास रंग ठाणे 2022 कार्यक्रमासही हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी श्रीमती लता शिंदे, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. श्रीमती शिंदे यांनी श्रीमती फडणवीस यांचे स्वागत केले तर श्री. म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
यानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टीपटॉप प्लाझा येथील ठाणे रास रंग 2022 या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन गरबा खेळणाऱ्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, तुमचा जोश पाहून मला खूप आनंद झाला. दोन वर्षानंतर गरबा रास खेळण्याचा तसेच आनंद व्यक्त करण्याची संधी माता राणीच्या कृपेने मिळाली आहे. माता राणीकडे एवढेच मागणे आहे की, सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान, ऐश्वर्य येऊ दे. सर्वांचे दुःख दूर होऊ दे.
यावेळी ढोलकी वाजविणाऱ्याचे विशेष कौतुक उपमुख्यमंत्री महोदयांनी केले.
०००